| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील हजारो गृहनिर्माण सोसायट्या अग्निसुरक्षा यंत्रणेकडे दुर्लक्ष करत आहेत. बहुतांश सोसायट्यांमध्ये आग प्रतिबंधक व्यवस्था बंद किंवा अपुरी असल्याने आणीबाणीच्या परिस्थितीत मोठा धोका निर्माण होत असल्याचे पालिकेच्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. या यंत्रणेचे नव्याने सर्वेक्षण
होणार आहे.
मागील आठवडाभरात पनवेलमध्ये तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या तीन घटनात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तीनही घटनांमध्ये घटनास्थळी कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याने तत्काळ मदत मिळू शकली नसल्याने आग पसरली. दरम्यान, अग्निशमन यंत्रणेबाबत नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे समोर आले असुन पनवेल महानगरपालिका परिसरातसह तालुक्यात हजारो सोसायट्यांची अग्निशमन यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर आली आहे. हजारों गृहनिर्माण सोसायट्यांपैकी केवळ 342 सोसायट्यांनी अग्निशमन विभागाकडे आवश्यक मफॉर्म बीफ सादर करून त्यांच्याकडील फायर सिस्टीम कार्यरत असल्याचे निश्चित केले होते. ही माहिती मे महिन्यातील असली तरी पालिकेने वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता पालिका हद्दीत सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. याबाबत पनवेल महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी याबाबत जनप्रबोधनाची गरज असल्याचे सांगितले. आग लागल्यास आपल्या सोसायटीत ती विझविण्यासाठी सक्षम यंत्रणा असावी. आग लागू नये यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा असल्याचे बोडके म्हणाले. रहिवाशांनी आपल्या सोसायटीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे याकरिता जनजागृती मोहीमदेखील राबवावी. आमच्याकडे रहिवाशांनी विनंती केल्यास आम्ही देखील सोसायटीमध्ये येऊन अग्निशमन यंत्रणेबाबत सोसायटीत येऊन जनजागृती करू, असे पनवेल मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी सांगितले.







