| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पालिके कडून 164 जणांना नोटीस बाजवण्यात आल्या आहेत. यामध्ये नोटिसा इमारती विकसित करणारे विकसक तसेच बेकरी उद्योजक, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सचा समावेश आहे. दोन आठवड्यांत सुधारात्मक उपाययोजना न केल्यास त्यांचे कामकाज बंद करण्यात येईल, असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेच्या अधिकारक्षेत्रात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या तत्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी, पालिका क्षेत्रातील बांधकाम साइट्स आणि विकास कामांची तपासणी करण्यासाठी वायु प्रदूषण नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संबंधित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचीही छाननी करेल आणि त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करेल. समितीमध्ये प्रभाग अधिकारी, उपअभियंता, सहायक नगररचनाकार आणि मुख्य आरोग्य निरीक्षक यांचा समावेश आहे.
समितीच्या समन्वयासाठी प्रभाग समिती स्तरावरील वायु प्रदूषण नियंत्रण उड्डाण पथक तयार करण्यात आले आहे. त्यात वॉर्ड अधीक्षक, पथक प्रमुख, मुख्य आरोग्य निरीक्षक, प्रभाग अभियंता आणि स्वच्छता निरीक्षकांचा समावेश आहे. प्रभाग समिती सध्या सुरू असलेल्या बांधकाम आणि विकास कामांच्या ठिकाणी भेट देऊन त्याचा अहवाल पर्यावरण विभागाला सादर करेल. हवामानातील बदलांमुळे एमएमआरमधील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. कमी वाऱ्याचा वेग आणि हिवाळ्यातील तापमान नैसर्गिक वायुवीजन कमी करते. कोरडे वारे आणि ढगाळ हवामानाचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, त्या मुळे आम्ही प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे.