वारसांना 1 फेब्रुवारीपासून कामावर घेण्याचे आश्वासन
| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे गावचे गोविंद हडकु पाटील, जगन्नाथ दामाजी पाटील व अनंता नामदेव पाटील या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लागवडीखालील जमीन कॅस्ट्रॉल कंपनीला त्यावेळी कारखान्यासाठी दिली होती. कंपनीने शेतकऱ्यांच्या वारसाला कंपनीत कायमस्वरूपी समाविष्ट करू, असे आश्वासनही दिले होते. परंतु, कंपनीने या शेतकऱ्यांच्या मुलांना कायमस्वरूपी कामावर घेतले नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वारसांनी सोमवार, दि. 30 डिसेंबर 2024 पासून कंपनीच्या गेटजवळ वारस वासुदेव गोविंद पाटील, सचिन अनंता पाटील व मंदार भगवान पाटील यांनी त्यांच्या कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले होते.
गेले तीन दिवस कॅस्ट्रॉल कंपनीच्या विरोधात चालू असलेल्या उपोषणामुळे उपोषणकर्ते वासुदेव गोविंद पाटील, सचिन अनंता पाटील व मंदार भगवान पाटील व त्यांच्या कुटुंबाची तब्येत खालावली होती. यामुळे चर्चा होणे गरजेचे असल्यामुळे खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर व माजी आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅस्ट्रॉल व्यवस्थापनाशी बैठक घडवून चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना यश आले असून, शेतकऱ्यांच्या वारसास सध्या कंपनीच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक फेब्रुवारी 2025 रोजी कामाला घेणार असून, भविष्यात कॅस्ट्रॉल कंपनीमध्ये नोकरभरती झाल्यास सर्व प्रथम शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे चर्चेमध्ये ठरले.
या कॅस्ट्रॉल व्यवस्थापनाशी चार तास झालेल्या बैठकीत तहसीलदार अभय चव्हाण, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, माजी आमदार मनोहर भोईर, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोईर, माजी सरपंच भगवान पाटील, पोलीस पाटील मच्छिंद्र पाटील, लायन ग्रुपचे बाळूशेठ फडके, टायगर ग्रुपचे निळूभाऊ चव्हाण, माजी सरपंच संदीप मुंढे, प्रवक्ते शैलेश सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे, माजी उपसरपंच महादेव गडगे, पँथर आर्मीचे सुशील जाधव, एमआयडीसीचे श्री. राठोड, सचिन दुर्गे, अमित जंगम, सुरेश गावडे व कंपनी व्यवस्थापनाचे जनरल मॅनेजर अजय झा, एचआर मॅनेजर सुनिल टेंबे यांच्यात चर्चा होऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी वारसांनी उपोषण सोडले आहे.
कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित व्यक्ती यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, आम्ही त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोनातून या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आहे. परिस्थिती समजून घेत आम्ही संबंधित व्यक्तीला आमच्या पाताळगंगा प्रकल्पामध्ये 1 फेब्रुवारी 2025 पासून कंत्राटी तत्त्वावरील फर्ममध्ये काम करायची ऑफर देऊ केली आहे.
प्रवक्ते, कॅस्ट्रॉल इंडिया