I मुंबई I प्रतिनिधी I
कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणार्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं. ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे.
परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असं सांगितलं.
सात दिवस क्वारंटाईन
केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यासोबत बैठक
मास्क वापरणं गरजेचं आहे असं सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा 5 पटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या 13 देशातून येणार्या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केलं जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं. मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
डोंबिवलीत ओमिक्रॉनचा संशयित
डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला केरोनाचा लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला लागण झाली असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. तसेच या व्यक्तीला झालेल्या करोनाचा संसर्ग हा नव्या प्रकारच्या ओमिक्रॉनफ व्हेरिएंटचा तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आल्याचेही पानपाटील यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्बातील अहवाल सात दिवसांमध्ये मिळेल. तो पर्यंत या रुग्णावर पालिकेच्या आरोग्य कर्मचार्यांचं लक्ष असणार आहे. त्याच्या उपचारांसंदर्भातील सर्व माहिती आणि तपशील वेळोवेळी पालिका कर्मचार्यांकडून तपासला जाईल असं यामधून स्पष्ट होत आहे.