| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेन, कि.मी. 9/600, च्या हद्दीत रविवारी टोयोटा अर्बन कुजर गाडीवरील चालकाने बलेनो गाडीस पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी पलटी होऊन गाडीतील एक जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
यातील अपघातग्रस्त वाहन टोयोटा अर्बन कुजर कारचे चालक नूरभालम खान (34), रा. आशापूरा, कि. रायबरेली, उत्तर प्रदेश हा चालवत होता. या कारमध्ये चालकाव्यतिरिक्त आणखीण तीन व्यक्ती व एक महिला होती. ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई ते लोणावळा असे जात असताना, कार चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे व अतिवेगाने चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, पनवेलजवळील कि.मी. 9/600 येथे आल्यावेळी समोरील बलेनो कार हिला पाठीमागून डाव्या बाजूला ठोकर मारली. या अपघातात कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील महिला अस्फिया बानू मो. फरीद खान (22) ही मयत झाली असून, चालक नूरआलम खान, मोहंमद अरबाज मोहंमद अहमद (24), मोहंमद आरीफ मोहंमद आक्षम (24) व रिजवान (24) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरिता एमजीएम रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच म.पो. केंद्र पळस्पेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल तालुका पोलीस ठाणे, पनवेल तालुका वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक कोंडी दूर केली आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
भीषण अपघातात एक ठार; चौघे गंभीर

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606