| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील कुंदन रेसिडेन्सी या इमारतीमध्ये युनियन बँकेमधील सेवानिवृत्त कर्मचारी रामदास गोविंद खैरे यांची हत्या करण्यात आली आहे. 72 वर्षीय खैरे हे युनियन बँकेतून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांची अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रज्योत चरण जाधव (27) यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एन.एम. हिंदोळा यांनी सदरचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारी सविता गरजे, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे अधिक तपास करीत आहेत.
रामदास खैरे दोन दिवसांपासून फोन उचलत नसल्यामुळे त्या ठिकाणी नातेवाईकाला जाऊन पाहण्यास सांगितले असता सदरची बाब लक्षात आली. त्यांच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती, असेदेखील समजले आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इमारती जवळ कोणत्याही प्रकारे सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करणे मोठे आव्हान असणार आहे.