। माणगाव । प्रतिनिधी ।
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद जयंती निमित्तानेे रविवारी (दि.12) सकाळी 7 वाजता किल्ले रायगड येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून चित्तदरवाजा, महादरवाजा व हत्ती तलावाच्या डावीकडून होळीचा माळ असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 30 रुपये असणार आहे. तसेच, नावे नोंदणीसाठी 11 जानेवारी संध्याकाळी 5 वाजता पाचाड धर्मशाळा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडरोहण स्पर्धेकरीता विविध वयोगटांतील गट तयार करण्यात येणार आहेत. त्यात पुरूषांचा प्रथम गट 14 वर्षाखालील मुले, द्वितीय गट 14 ते 17 वर्षापर्यंत, तृतीय गट 17 ते 21 वर्षापर्यंत, चतुर्थ गट 21 ते 30 वर्षापर्यंत, पाचवा खुला गट 30 वर्षांवरील. तर, महिलांचा प्रथम गट 14 वर्षापर्यंत मुली, द्वितीय गट 14 ते 17 वर्षापर्यंत, तृतीय खुला गट 18 वर्षांवरील, असे गट पाडण्यात येणार आहेत. तसेच, स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (दि.12) सकाळी 10 वाजता किल्ले रायगड येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना प्रत्येक गटांमध्ये पाच बक्षिसे देण्यात येणार आहे. त्यात, प्रथम क्रमांकाला 5 हजार रू., द्वितीय क्रमांकाला 4 हजार रु., तृतीय क्रमांकाला 3 हजार रु., चतुर्थ क्रमांकाला 2 हजार रु. व पाचव्या क्रमांकाला 1 हजार रु. अशी बक्षीसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यवाह संतोष कदम यांनी केले आहे. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी महेश गायकवाड (8149248872), अविनाश चव्हाण (9890423478), संतोष माटेकर (7774878432) आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी
गडरोहण स्पर्धेसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक असून त्याला सत्यप्रत जोडावे. पत्रक पूर्णपणे भरल्याशिवाय स्पर्धेत प्रवेश मिळणार नाही. अठरा वर्षाखालील स्पर्धकांच्या पालकांची प्रवेश पत्रावर सही असणे बंधनकारक राहील.स्पर्धकांनी रविवारी (दि.11) सायंकाळी 7 वाजता पाचाड धर्मशाळा या ठिकाणी उपस्थित रहावे. तसेच, या स्पर्धेतील अंतिम निर्णय स्पर्धा संयोजकांचा राहणार आहे.