शेती जनजागृती उपक्रमाचे आयोजन

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

कृषि विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा, रायगड मार्फत कृषक स्वर्ण समृध्दी आठवडा दि. 23 ते 27 सप्टेंबर, या कालावधीत कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार विविध उपक्रमांव्दारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी नैसर्गिक शेती विषयी जनजागृती शेतकरी जनजागृकता कार्यक्रमाचे आयोजन ऊसरोली टेप, मुरुड-जंजिरा येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा, रायगड आणि मुरूड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

शेतकरी जनजागृकता उपक्रमाचे कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर, डॉ. राजेश मांजरेकर व प्रा. जीवन आरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच तालुका कृषि अधिकारी श्रीमती. मनिषा भुजबळ व कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य व मुरूड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन श्रीधर जंजिरकर, माजी सरपंच सौ.कुमरोठ्कर , कृषी अधिकारी रविंद्र सैदाणे तसेच माजी कृषी अधिकारी दिलीप पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरूवातीला डॉ. प्रमोद मांडवकर यांनी प्रास्ताविक सादर करताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान तसेच तंत्रज्ञान प्रसार माध्यमांचा उपयोग करण्याविषयी माहिती दिली. डॉ. राजशे मांजरेकर यांनी नैसर्गिक शेतीची तत्वे, फायदे, तसेच नैसर्गिक शेतीमधील गोआधारीत कार्यप्रणालीचा विषयी सखोल मार्गदर्शन केले. जीवन आरेकर यांनी पिकाच्या किड व रोग नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर, दशपर्णी अर्काची कार्यपध्दती याविषयी माहिती दिली. श्रीमती. मनीषा भुजबळ यांनी शासनाच्या नैसर्गिक शेती धोरण तसेच कृषी संबंधी योजनांची माहिती उपस्थितांना दिली. श्रीधर जंजिरकर यांनी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीचा जास्तीत जास्त अवलंब शेतक-यांनी करावा असे आवाहन केले. कार्यक्रमास उमरोली टेप व नांदगाव परिसरातील शेकडो शेतक-यांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता कृषि विज्ञान केंद्रचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी यांनी तसेच मुरुड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी ऋतुजा चौलकर व निकीता रणदिवे यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version