। रसायनी । वार्ताहर ।
गेली दोन वर्ष काम करत असताना मातांचा सहभाग वाढवण्यासाठी पोयंजे केंद्र अविरत प्रयत्न करीत होते, मात्र योग्य पद्धतीने व कार्यशाळेच्या माध्यमातून सहभाग कसा वाढवता येईल यासाठी केंद्रप्रमुख निंबाजी गीते यांच्या संकल्पनेतून व शिक्षकांच्या योगदानातून माता पालकांसाठी एका उत्कृष्ट कार्यशाळा घटक संचाची निर्मिती करून पोयंजे केंद्रातील सर्व मातांसाठी कृतीयुक्त कार्यशाळेचे जिल्हा परिषद शाळा पोयंजे येथील सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई विभागीय समन्वयक ऋतुजा पाटील, मुख्याध्यापक सुशीला लवटे, गवळे उपस्थित होत. यावेळी केंद्राने तयार केलेल्या घटक संचाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाचा भविष्यवेधी असा निपुण भारत कार्यक्रम अर्थात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याविषयी संपूर्ण राज्यात काम सुरू असून सन 2026-27 पर्यंत देशातील प्रत्येक बालकाला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अवगत झाले पाहिजे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राज्याची शिखर संस्था असणारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तसेच डायट पनवेल यांचेमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शासनाने नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी मूलभूत कौशल्यांचा अभ्यास व्हावा, यासाठी शाळा पूर्वतयारी या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली त्यात मातांचा सहभाग आवश्यक मानला गेला आहे. याचाच एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते तिसरीमधील विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त करून देण्यासाठी निपुण भारत कार्यक्रमाचे स्तंभ असणारे विद्यार्थ्याचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य, उत्तम संवादात, व सक्रिय अध्ययनकर्ता या पिलरवर आधारित एक दर्जेदार घटक संच निर्माण करून पालक व शिक्षकांना एक दिशा देण्यात आली. या कार्यशाळेत शिक्षणातील मातांचा सहयोग यासाठी विविध कृतींची योजना आखण्यात आली. त्याप्रमाणे दिवसभरात सात प्रकारच्या विविध कृती घेण्यात आल्या. त्यातून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, अभिव्यक्ती, अंदाज बांधणे, स्मरणशक्ती, विद्यार्थी सुरक्षितता व सुजन पालकत्व यावर तज्ञ शिक्षकांनी मातांशी संवाद साधला व प्रत्यक्ष अनुभूती दिली, कृतींचे प्रात्यक्षिक दाखवले या सर्व कृतींना उपस्थित मातांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध कृतींमध्ये आपला सहभाग नोंदवला.
पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यासाठी काळुंद्रे व पोयंजे केंद्रातील मातांसाठी केंद्रप्रमुख निंबाजी गीते साहेब यांनी राबविलेली संकल्पना राज्यासाठी दिशादर्शक असून हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर दखल घेणार आहोत. ही कार्यशाळा अत्यंत प्रभावी झाली असून त्यातून माता पालकांना आपल्या पाल्यांना घरी कशा पद्धतीने कृती देता येईल याची दिशा मिळाली. संपूर्ण मुंबई विभागातील हा पहिलाच प्रयोग आहे.
– ऋतुजा पाटील, मुंबई विभागीय समन्वयक,
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन