मजुरांची कमतरता, प्रतिव्यक्ती 400 ते 500 रु. खर्च
| सुकेळी | वार्ताहर |
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील परतीच्या पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जवळपास ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाचा हाहाकार सुरुच होता. परंतु, चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण नागोठणे परिसरामध्ये शेतकर्यांची भातकापणीची मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येत आहे.
परतीच्या पावसाने शेतातील भाताची सर्व रोपे ही जमिनीवर आडवी पडून सर्वत्र विखुरल्यामुळे भातकापणी करताना मजुरांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहेत. भातकापणी करताना शेतामध्ये पुन्हा नव्याने उगवलेले भाताचे कोंबदेखील अडथळे ठरत आहेत. ज्या ठिकाणी भातकापणीसाठी दोन ते तीन दिवस लागायचे, त्या ठिकाणी भातकापणी करण्यासाठी आठ ते नऊ दिवस लागत आहेत. त्यातच भातकापणीसाठी लागणार्या मजुरांची कमतरता भासत आहे.
बहुतांशी आदिवासी मजूर हे दरवर्षी आपापल्या शेतीची कामे पूर्ण करुन दुसरीकडे मजुरीसाठी जातात. परंतु, यावेळी मात्र उशिरापर्यंत सुरु राहिलेल्या पावसामुळे भातकापणीची कामे ही सर्वांची एकदमच निघाल्यामुळे मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यातूनच जरी मजूरकर मिळाले, तरी 400 ते 500 रु. एका माणसाची मजुरी, दोनवेळचे जेवण व चहापाण्यासाठी आणखी वेगळे पैसै असा मोठ्या प्रमाणात खर्च शेतकर्यांना मजुरांवर करावा लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारी महागाईची बी बियाणे, मजुरांचा खर्च व परतीच्या पावसाचा बसलेला फटका अशा सर्व गोष्टींचा विचार करता यापुढे शेती करायची की नाही, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.