पाकिस्तानच्या पोरींचा धक्कादायक पराभव

। क्वालालंपूर । वृत्तसंस्था ।

मलेशियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील मुलींच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत आयर्लंडच्या मुलींनी सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला आहे. आयर्लंडने या विजयासह अंतिम 6 मधील जागा पक्की केली आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातली लढत 9-9 षटकांची खेळवण्यात आली. प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडने 5 बाद 69 धावा करताना पाकिस्तानसमोर 70 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयर्लंडकडून सलामीसाठी आलेल्या एलिसे वॉल्शने 31 धावा केल्या. त्यानंतर एनाबेल स्क्वेरेसने 13, फ्रेया सार्जंटने 11 व एबी हॅरीसनने 10 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या संघाला 9 षटकांत 7 बाद 59 धावाच करता आल्या आणि त्यांचा 10 धावांनी पराभव झाला.
पाकिस्तानची कर्णधार कोमल खानने 12, फतिमा खानने 10 धावा करताना पाकिस्तानला चांगली सुरूवात करून दिली होती. अरिशी अन्सारीने 10 धावांचे योगदान दिले, परंतु अन्य फलंदाज अपयशी ठरल्या. आयर्लंडकडून एलि मॅकगीने 2 बळी घेतले. हा विजय मिळवून आयर्लंडने ‘ब’ गटातून अंतिम 6 मध्ये प्रवेश मिळवला आहे. पाकिस्तानचा हा 3 सामन्यांतील दुसरा पराभव ठरला आणि एक सामन्याचा निकाल न लागल्याने त्यांना स्पर्धेतून साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे.

Exit mobile version