17 मे रोजी कामोठ्यात शांततामय जनआंदोलनाचा इशारा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत भारतीय शेतकरी कामगार पक्षाने 17 मे रोजी कामोठे येथील पाणीपुरवठा केंद्राजवळ सकाळी 11 वाजता शांततामय जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील 29 गावांसह खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल या सिडको विकसित उपनगरांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. कोटींच्या घरात घरांच्या किंमती असतानाही नागरिकांना पिण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने महिलांपासून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच घटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाढती लोकसंख्या, नव्या वसाहती आणि औद्योगिक विस्तारामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली असताना पुरवठा मात्र अपुरा पडत आहे. यासंदर्भात शेकापचे नेते अरविंद म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे अतिरिक्त पाणी उपलब्ध असूनही पनवेलला आवश्यक पुरवठा केला जात नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. किमान 30 एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने देण्याची मागणी वारंवार करूनही कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही महापालिकांमध्ये समन्वय साधावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
पनवेलकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागते ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. 30 एमएलडी पाणी देण्याची आमची मागणी रास्त असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 17 मेचे आंदोलन तीव्र केले जाईल.
अरविंद म्हात्रे,
विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका
घरासाठी कोटी रुपये मोजले, पण पिण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती असह्य झाली आहे.
शर्वरी जगताप,
खारघर
