। माणगाव । वार्ताहर ।
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत माणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान तालुका कृषीअधिकारी रवींद्र पवार यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग अंतर्गत खरीप हंगामामध्ये संन 2022 -23 या वर्षामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटक्या जमाती, निराधिसूचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे,जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी,अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी (वनहाक्के मान्य करणे ) अधिनियम 2006 (2007 चा 2 ) खालील पात्र लाभार्थी आहेत. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थी शेतकर्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच या योजने अंतर्गत फळबाग लागवडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.00 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. सदर योजनेत लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. तसेच सदरील जमीन कुळ कायाद्याखालील येत असल्यास 7 /12 वर कुळाचे नाव असेल तर सदरील योजना राबवीत असताना कुळाची समत्ती घेणे गरजेचे राहील.
या योजनेअंर्गत शेतकरी आंबा, काजु, चिकु, पेरू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबु, साग, जाड्रोफा, गिरीपुष्प, कडीपत्ता, कडुलिंबू, सिंधी, शेवगा, हादगा, केळी, ड्रॅगनफ्रूट, द्राक्ष, चंदन, गुलमोहर, करवंद,मॅजियम, ताड, खैर, बाभुळ, सुबाभुळ, गुलमोहर इत्यादी अशा प्रकारे 59 फळपिकांची लागवड करू शकतात. या योजनेचं लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, जॉब कार्ड, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये मोडत असल्यास जातीचा दाखला, आधार कार्ड, व बँकेचे पास बुक अर्जा सोबत जोडून ग्रामपंचायत कार्यालय किंवा कृषि सहाय्यक यांचे कडे सादर करावे. पारंपरिक शेती न करता शेतकर्यांनी आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड करून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी रवींद्र पवार यांसकडून करण्यात येत आहे.