| नवी मुंबई | प्रतिनिधी |
ऐरोली सेक्टर पाचमधील खेडकर चौकातून रस्ता ओलांडून जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.29) सायंकाळी घडली आहे. या अपघातानंतर रबाळे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव बालाजी पिराजी फुले (39) असे असून तो ऐरोली सेक्टर चारमध्ये कुटुंबासह राहत होता. तो पेंटिंगचे काम करतो. मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास बालाजी फुले हा ऐरोली सेक्टर पाच येथील खेडकर चौकातून रस्ता ओलांडून सेक्टर चारच्या दिशेने जात होता. दरम्यान, मुलुंड येथून रबाळेच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. यात बालाजी गंभीर जखमी झाल्याने त्याला ऐरोलीतील राजमाता जिजामाता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातात बालाजीला धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.