| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण आणि भांडुप परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणे तसेच वीज बिलाबाबत वाद आणि वीजचोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर शनिवारी (दि. 28) आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन आपापली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
भांडुप आणि कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात 28 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी दोनदरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परिमंडलांतर्गत कल्याण एक, कल्याण दोन, वसई, पालघर, वाशी, ठाणे आणि पेण या मंडलातील संबंधित ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येणार आहे. संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.