कृषीवलच्या दणक्याने प्रशासनास जाग; नितेश पाटील यांच्या पाठपुराला यश
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील पाणदिवे येथील हुतात्मा परशुराम रामा पाटील स्मारकात ठेकेदार अशोक शेडगे याने जलजीवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य मागील दोन वर्षांपासून ठेवले होते. याविरोधात कृषीवलने आवाज उठवून ‘हुतात्म्यांचा अवमान’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच संबंधित विभागास जाग आली. त्यानंतर तात्काळ स्मारकातील साहित्य हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. याबाबत काँग्रेसचे नितेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कृषीवल आणि नितेश पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली होती.त्यामुळे या व्यक्तीविरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा.संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे 25 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला होता. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम, पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहारदेखील केला होता. ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांच्या कार्याची व पत्रव्यवहाराची दखल घेत सदर स्मारक मधून बांधकाम साहित्य काढण्यात आले आहे. त्यामुळे स्मारक संरक्षित, सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. याकामी कृषीवलचे, तसेच कामगार नेते महेंद्र घरत, ग्रामसेविका उर्मिला पाटील, सरपंच कलावती पाटील, सदस्य कमलाकर गावंड, समस्या रसिका ठाकूर यांचे नितेश पाटील यांनी आभार मानले आहेत. नितेश पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याने स्मारक संदर्भात समस्या मार्गी लागली. मात्र, संबंधित ठेकेदारावर कोणतेही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी नितेश पाटील यांनी चिरनेर येथे हुतात्मा दिनी खा. श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.