नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
नफा देण्याच्या बहाण्याने मुरूडमधील असंख्य नागरिकाची आर्थिक फसवणूक करणार्या रियाज बंदरकरला रायगड पोलिसांनी अटक केली होती. फसवणूक करणार्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. आणखी कोणाची त्याने फसवणूक केली असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुरूड तालुक्यातील खारीकपाडा येथील रियाज अहमद कासिम बंदरकर (47) याने 2019मध्ये तिजाराहा इंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरु केली होती. मुरूड तालुक्यातील काही नागरिकांचा विश्वास संपादन करून कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. चांगला नफा देण्याचे अमिष त्याने दाखवून त्याने 1 कोटी 78 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. त्यानंतर तो दुबईला पळून गेला होता. याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात बंदरकर याच्याविरोधात 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 24 मार्च रोजी त्याला कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे करीत आहेत. रियाज बंदरकर याने दाखल गुन्ह्याप्रमाणे फसवणूक केली असल्यास त्वरित स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसोबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनानंतर रियाज बंदरकर याच्या आणखीच मुसक्या आवळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.