उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |

उरणमधील वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मागील 40 वर्षांपासून उरण परिसरात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, वायू विद्युत केंद्र, बीपीसीएल या केंद्र-राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या विविध प्रकल्पांवर आधारित अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. जेएनपीए परिसरात तर 500 हेक्टर क्षेत्रात मोठ मोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत, तर आणखी उभारले जात आहेत. मात्र, बंदरातील जहाज वाहतूक, तेल आणि रासायनिक कंपन्यांमुळे परिसरात जल, वायुप्रदूषण वाढले आहे.

जेएनपीए आणि या बंदरावर आधारित असलेल्या अन्य बंदरांतून दरवर्षी सुमारे 50 लाख कंटेनर मालाची जहाजातून वाहतूक केली जाते. मोठ्या प्रमाणावर होणार्‍या कंटेनर मालाच्या आयात-निर्यातीसाठी जगभरातून मालवाहू जहाजे जेएनपीटी बंदरात येत असतात. जहाजातून केरकचरा, वापरून झालेले काळे तेल बंदी असतानाही चोरीछुपे समुद्रात सोडले जाते, त्यामुळे समुद्रात जलप्रदूषण होत आहे. परिसरातील रासायनिक कंपन्यांमधून सोडण्यात येणार्या प्रदूषित रसायनमिश्रित सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. रसायनमिश्रित दूषित सांडपाणी नाल्यातून समुद्र, खाड्यांत मिसळत असल्यानेही जलप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.

ओएनजीसी प्रकल्पातून हायड्रोजन सल्फाइड (एचटूओ) हा विषारी वायू हवेत सोडला जात असल्याने लगतच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा वायू हवेपेक्षा जड असल्याने खालीच राहतो, त्यामुळे या परिसरातील गावातील नागरिकांना श्‍वसनाच्या अनेक व्याधीने ग्रासले आहे. प्रदूषणाचा फटका परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल आणि विहिरींनाही बसला आहे. विहीर आणि बोअरवेलच्या पाण्याला उग्र दर्प येत असून, पाण्यावर तेलतवंग दिसू लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डोंगरातून येणारे पाण्याचे झरेही दूषित झाले आहेत, त्यामुळे नागाव-म्हातवली परिसरातील विहिरी, बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा खटाटोप कंपन्या आणि प्रकल्पांकडून केला जात असला तरी झाडे लावण्याचे आणि जगविण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखविले जातात, प्रत्यक्षात ते खाऊन खाऊन अधिकारी व ठेकेदार मालामाल झाले आहेत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता लवकरच प्रवाशी रेल्वे सुरू झाली आहे. त्यामुळे आजूबाजूला झोपडपट्टीत वाढ होऊन प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली दगड-मातीच्या भरावासाठी डोंगर पोखरून भुईसपाट केले आहेत, त्यामुळे झाडे, झुडपे, वनराईच नष्ट झाली आहे. त्याचा दुष्परिणामही प्रदूषणवाढीत झाला आहे. जलप्रदूषणामुळे समुद्र, खाड्यांतील मासेमारीही संकटात सापडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही परिसरातील वाढत्या प्रदूषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

Exit mobile version