गोवेलेतील तळे आटले; पुनरुज्जीवनाची गरज!

प्रशासनाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तळ्याची वाडी या लोकवस्तीची ओळख असलेले गाव तलाव पाण्याअभावी आटले आहे. गाळाने भरलेल्या या तलावाची पाणी साठवण क्षमता घटल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावातील गाळ काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सामाजिक विकास अभियानात समाविष्ट झालेल्या गोवेले ग्रुप ग्रामपंचायतीमधील या तलावाचे पाणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच आटले आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे.
दरम्यान, राज्य शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी गाळयुक्त शिवार योजनेला कायमस्वरूपी मान्यता दिली आहे. या योजनेतून जुन्या तलावांमधील गाळ काढण्ो, खोली वाढविणे, पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे अशी कामे करता येतात. तलावातील पाणी अधिक काळ टिकवून भूजल पातळी वाढविण्यासाठीही या योजनेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे गोवेले तळ्याची वाडी येथील तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.

विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यात पालकमंत्री बळीराजा चारा संजीवनी योजनेंतर्गत तळ्याची वाडी येथील गायरान माळावरील गवत कापणी करून चारा पाठविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. मात्र, याच परिसरातील गावाची ओळख असलेला तलाव आटून गाळाने भरल्याची बाब उपस्थित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आली नाही. चारा संजीवनीसोबतच गावातील पाणी साठवण क्षमता वाढविण्याकडेही लक्ष देण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version