। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठेत महावितरण विभागाच्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील रिक्षा स्टँड ते मच्छी मार्केट पर्यंत असलेल्या महावितरण विभागाच्या विद्युत प्रवाहाच्या तारा या प्रमाणापेक्षा खाली लोंबकळत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या काही प्रमाणात तळा बसस्थानकातून एसटीची वाहतुक सुरू झाली असून जाता येताना एसटीच्या वरच्या भागाला सदर विद्युत तारांचा स्पर्श होत आहे. तसेच मोठमोठी वाहने व्यापार्यांचा माल घेऊन या रस्त्यावरून येत असतात. अशावेळी ही विद्युत तार गाडीला लागून तुटण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. एखाद्या गाडीला स्पर्श होऊन अपघात घडला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण विभागाने बाजारपेठ परिसरात लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची ऊंची वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.