। अलिबाग । प्रतिनिधी ।
येत्या 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशाच्या स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली, तसेच इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले अशा क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी शनिवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील कुरुळ कॉलनीतील आरसीएफ शाळेच्या वतीने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रभातफेरीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून होणार असून, संपूर्ण आरसीएफ कॉलनीच्या दोन कि.मी. परिसरात ही प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये आरसीएफ प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेचे ज्युनिअर केजीपासून इयत्ता पहिलीचे जवळपास 550 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सर्व मुलांना तिरंग्याच्या रंगाप्रमाणे ड्रेस कोड देण्यात आला आहे. या प्रभात फेरीत 75 क्रांतिवीरांची वेशभूषा करणारे विद्यार्थी अग्रभागी राहणार आहेत. या सर्व क्रांतिवीरांची माहिती शिक्षिका सर्व नागरिकांना देणार आहेत. या प्रभात फेरीत मुलांसह शिक्षक आणि पालकही सहभागी होणार असून, त्यांनाही तिरंग्याचाच ड्रेस कोड देण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक प्रतिनिधी रिना थोरात आणि शिक्षक वृंद या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. प्रभात फेरीत सहभाग घेणार्या मुलांचे कौतुक करण्यासाठी अलिबागकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका विसावे यांनी केले आहे.