प्रवाशांच्या तक्रारी, सुचनांकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
स्थानिक पातळीवर प्रवाशांच्या तक्रारी व सुचनांचे निराकरण करण्यासाठी रायगड जिल्ह्यात प्रत्येक सोमवारी प्रवासी राजा दिनाचे आयोजन केले जाते. यावेळी प्रवाशांच्या तक्रारी रजिस्टरवर लिहून घेतल्या जातात. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक देतात. मात्र, त्यांच्याच आदेशाची पायमल्ली होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील अलिबागसह अनेक आगारात प्रवासी राजा दिन फक्त कागदावरच दिसत आहे. तसेच, प्रवाशांच्या सुचना व समस्यांकडे आगारातील अधिकार्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे.
एसटी बस वेळेवर सोडणे, आगारातून ज्यादा बसची व्यवस्था करणे, स्वच्छता राखणे, कर्मचार्यांकडून योग्य वागणूक न मिळणे, अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात. मात्र, त्यांचे निरसन होत नाही. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने एक दिवस प्रवाशांसाठी देण्याचा प्रयत्न प्रवासी राजा दिन या उपक्रमातून केला आहे. रायगड जिल्हयात या दिनाची अंमलबजावणी करण्यासाठी विभाग नियंत्रक जिल्ह्यातील आगारात प्रत्येक सोमवारी जाऊन प्रवाशांच्या तक्रारी, समस्या व सुचनां ऐकून घेतात. त्यानंतर त्या तक्रारी रजिस्टरमध्ये लेखी स्वरुपात नोंदवून घेण्याच्या सुचना तेथील कर्मचार्यांना देतात. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही देखील करण्याचे आदेश स्थानक प्रमुखांना दिल्या जातात. अलिबाग आगारातून नागाव-अलिबाग, महाजने-अलिबाग तसेच माणगाव आगारातून माणगाव-साई ही एसटी बस सेवा सुरु करण्याची लेखी तक्रार प्रवासी दिनाच्या निमित्ताने प्रवाशांनी केली होती. त्या तक्रारी रजिस्टरमध्ये लिहून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिले होते. प्रवासी दिनाचे आयोजन करून एक महिना उलटून गेला. परंतु, अद्यापर्यंत विभाग नियंत्रकांच्या आदेशाचे पालन अलिबाग व माणगाव आगारातील स्थानक प्रमुखांकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी राजा दिन फक्त कागदावर असल्याचे चित्र दिसून आले आहे. एसटी महामंडळाने राबविलेला हा उपक्रम चांगला असला, तरी प्रवाशांना फक्त तात्परता दिलासा देणारा ठरत आहे.
जनतेपर्यंत जनजागृतीचा अभाव
जिल्ह्यातील प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी खास प्रवाशांसाठी प्रवासी राजा दिन आयोजित केला जातो. मात्र, रायगड जिल्हयात हा उपक्रम राबविला जात नाही. गुपचूप चार भिंतीमध्ये उपक्रम होत असल्याचा संशय आहे. या दिनाची माहिती जनतेला समजणे आवश्यक आहे. मात्र, रायगड विभागाकडून या दिनाबाबत जनतेपर्यंत जनजागृती अभाव असल्याचा आरोप केला जात आहे.
प्रवाशांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रवासी राजा दिन हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र, त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे. एसटीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक झालेली नाही.
अमित कंटक,
सदस्य,
रायगड एसटी प्रेमी संघटना
प्रवासी राजा दिन या उपक्रमातून प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या आगारातून हे प्रश्न सुटले नाहीत. त्यांच्याकडून त्याचा खुलासा मागविण्यात येणार आहे. संबंधितांविरोधात कारवाईदेखील केली जाईल.
दिपक घोडे,
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड