पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणाची कार्यवाही

| अलिबाग | प्रतिनिधी |

कृषी विभागामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनांतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला असून, अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालय, पुणे अंतर्गत कृषी अभियांत्रिकी संचालनालयाचे कृषी संचालक अंकुश माने यांनी दिली आहे.

कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना-अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित अवजारे, पीक काढणीनंतरची अवजारे, प्राथमिक प्रक्रिया अवजारे, पीक संरक्षण अवजारे तसेच भाडेतत्त्वावरील सेवा सुविधा केंद्रे उभारण्यासाठी अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
सन 2026-27 या आर्थिक वर्षात या तीनही योजनांसाठी एकूण रु. 263.72 कोटी इतका निधी प्राप्त झाला असून, प्रक्रियेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांसाठी सन 2025-26 मध्ये कृषी यांत्रिकीकरणाच्या वरील तीनही योजनांअंतर्गत एकूण रु. 1,056.31 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांना वेळेत अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी विभागामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक अंकुश माने यांनी सांगितले.

Exit mobile version