रायगडकरांच्या मागणीनुसार कृषीवल हप्तेखोरांच्या शोधात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस अधिकारी नामधारी असून, राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे हवालदार कारभार चालवत असल्याचे खात्रीशीर वृत्त ‘कृषीवल’च्या हाती आले आहे. अधिकारी स्थानिक नसल्याचा फायदा घेत काही हवालदार हुकूमशाही गाजवत असल्याचे समोर आले आहे. दिवसभर हप्तेवसुली करुन एक-दोन तास कामावर हजर राहणार्या त्या हप्तेखोरांवर पोलीस अधीक्षक कसा अंकुश ठेवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्ह्याला हप्तेखोरीचे ग्रहण लागल्यामुळे अनेक अवैध धंदे, कामांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांतील अधिकार्यांची नावे यामध्ये आल्याने नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच ‘कृषीवल’ने केलेल्या सर्व्हेमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे अधिकारीवर्गाचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अनेकदा तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. परिणामी, पोलिसांबाबतचा आदर आणि गुन्हेगारांवरील अंकुश दोन्ही कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात जुगार, मटका, गावठी दारु, बार आदि विविध अवैध धंदे करणारे, अपरात्रीपर्यंत सुरु राहणार्या बार चालकाकडून हप्ते वसुली करणार्या आणि कलेक्टर नावाने ओळखल्या जाणार्या पोलीस कर्मचार्यांची नावे समोर आली आहेत. पोलीस विभागाची प्रतिमा मलिन करणार्या हप्तेखोर पोलीस कर्मचार्यांना वरिष्ठांचा धाक राहिला नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.
राजरोसपणे हप्ते वसूल करणारे पोलीस कर्मचारी आपल्या वरिष्ठांना खूष ठेवत असल्याने वरिष्ठदेखील याकडे कानाडोळ केला जात असल्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे. साध्या वेषात असणारे पोलीस कायदा व सुव्यवस्थेचे काम करण्याऐवजी भरपूर कमाई कशी होईल, याकडे लक्ष देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याशिवाय त्यांच्या कामाची वेळही निश्चित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कधीही ये-जा करणार्या कलेक्टर मंडळींवर वरिष्ठ अधिकार्यांचा लोभ असल्याचे यावरुन स्पष्ट होते. परिणामी, अशा भ्रष्ट पोलिसांमुळे प्रामाणिकपणे काम करणार्या कर्मचार्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. करवाईअभावी कलेक्टर सोकावल्याने रायगड जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे समूळ नष्ट करण्यासाठी कृषीवलने हत्यार उपसले आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्यांवर कृषीवल नजर ठेवून आहे. अशातच आता अधिकार्यांना दिल्या जाणार्या हप्त्यांबाबतची माहिती समोर आली आहे. मटका, वाईन, बियर शॉप तसेच ऑईल, भंगार आदिंकडून घेतल्या जाणार्या हप्त्यांची रक्कम आणि नावे कृषीवलच्या हाती लागली असून यामागे नेमका कोण सुत्रधार आहे, याबाबतची माहिती कृषीवल घेत आहे.
कृषीवलला मिळालेल्या माहितीनूसार, महिन्याला मटका, वाईन, बियर शॉप तसेच भंगारवाल्यांकडून 3 लाख 70 हजार रुपये तर डिझेलसाठी अडीच लाख रुपये तर जुगारासाठी तब्बल 17 लाख रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे. हा हप्ता कोण वसूल करतोय, याबाबतची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याची सत्यता तपासून कृषीवल लवकरच भांडाफोड करेल.
कोण आहेत पोवळे, आवटी, म्हात्रे?
मिळालेल्या माहितीनुसार, पोवळे, आवटी व म्हात्रे नावाच्या व्यक्तींकडून रायगड जिल्ह्यातील अधिकार्यांना हप्ता दिला जात आहे. मात्र, ती अदृश्य व्यक्ती कोण, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याबाबत ‘कृषीवल’ची टीम माहिती घेत असून, माहिती मिळताच त्याची सत्यता पडताळून त्यावरील पडदा हटविण्यात येईल.
नागरिकांना, कर्मचार्यांना आवाहन
याबाबत नागरिकांकडे तसेच काही संबंधित विभागाच्या कर्मचार्यांकडे माहिती अथवा पुरावा असल्यास ‘कृषीवल’ला संपर्क साधून आपण माहिती देऊ शकता. आपले नाव गुपित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी ‘कृषीवल’ची असेल.
हप्त्यांची चर्चा
पोवळे जुगार, लॉटरी 17 लाख रुपये
म्हात्रे मटका 70 + 15
म्हात्रे मटका 80 + 20
कडवे मटका 60 + 15
वाईन शॉप 30 + 05
वाईन शॉप 30 + 05
बियर शॉप 05 + 02
भंगार 15 + 05
भंगार 10 + 03