संकटकाळात नागरीकांना तात्काळ मदत
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हया पोलीस ब्रीदवाक्याला सार्थक अशी कामगिरी करीत अडचणीत असलेल्या व्यक्तीला तात्काळ पोलीस मदत पोहचविण्यामध्ये मे महिन्यात रायगड जिल्हा पोलीस दल राज्यातुन दुस-या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच संकटात सापडलेल्या व्यक्तीला जलद गतीने पोलीस मदत पोहचविण्याचे काम पोलीस विभागामार्फत होत आहे.
पोलीस अधीक्षक रायगड श्री. अशोक दुधे यांच्या नेतृत्वामध्ये व अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री. अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडीत व्यक्तीपर्यंत तत्काळ मदत पोहचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ” डायल ११२ ‘ प्रणालीकरीता पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड, पोलीस नियंत्रण कक्ष येथे २ पोलीस अधिकारी व ०७ पोलीस अंमलदार अशी जलद प्रतिसाद यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे. पीडीत व्यक्तींपर्यंत तात्काळ पोलीस मदत कशी पोहचली जाईल याचा सखोल अभ्यास करून यंत्रणेस अधिक प्रशिक्षीत व प्रोत्साहीत करण्यात आले. पुर्वी पीडीत व्यक्तींपर्यंत पोलीस मदत पोहचविण्याचा कालावधी २० ते ३० मिनिट असा होता. तो मे महिन्यामध्ये ०९ मिनीट ५५ सेकंद इतका आणुन महाराष्ट्रातुन सर्वात कमी वेळात पीडीतांना पोलीस मदत पोहचविण्याची प्रशंसनीय कामगिरी रायगड पोलीस दलामार्फत करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रायगड श्री अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री अतुल झेंडे यांनी कार्यालय पातळीवर व पोलीस ठाणे पातळीवर ‘डायल ११२’ प्रणालीकरीता काम करणा-या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे. तसेच भविष्यात अगदी कमीत-कमी वेळात पीडीतांपर्यंत पोलीस मदत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे सांगितले.