पहाटेच्या गारव्याने नागरिकांना हुडहुडी
| अलिबाग | प्रतिनिधी |
नोव्हेंबरचा उत्तरार्ध सुरू होताच रायगड जिल्ह्यात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा वाढत असून, रात्रीही थंडीची जाणीव होऊ लागली आहे. सकाळी घराबाहेर पडणारे नागरिक, मॉर्निंग वॉकसाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना थंडीचा अनुभव येत आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि सकाळ-संध्याकाळचा गारवा अशा बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात थंडीचे आगमन होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल जाणवत असून, पहाटेच्या वेळी गार वारे वाहात आहेत. सकाळी उशिरापर्यंत हवेत थंडावा टिकून राहात आहे. रात्रीच्या वेळीही तापमानातील फरकामुळे थंडीची जाणीव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून स्वेटर, जॅकेट आणि उबदार कपड्यांचा वापर सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अलिबाग केंद्राच्या 22 नोव्हेंबरच्या अंदाजानुसार, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ गारवा आणि दिवसा उष्णता असे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीची चाहूल लागल्याने नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेच्या थंडीत बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा.






