। महाड । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगड येथे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्री किल्ले रायगडावर येणार आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून किल्ले रायगडावर आत्तापासूनच सुरक्षा यंत्रणेने कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका किल्ले रायगड पाहण्यास येणाऱ्या शिवभक्तांसहित देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना बसत असून, सुरक्षा यंत्रणेमुळे पर्यटकांकडून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगड येथे चैत्र पौर्णिमा, शालिवाहन शके, शुक्रवार 11 व शनिवार 12 एप्रिल रोजी राजसभेमध्ये सकाळी 11 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्याकडून करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणेने महाडपासून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गापासून ते किल्ले रायगडावर पायऱ्यांमार्गे व रोपवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचे काम चालू केले आहे. या सुरक्षा यंत्रणेमुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमुळे पर्यटक व शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शुक्रवारी 11 एप्रिल रोजी रात्री सात वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर येथे दीप वंदनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8.30 पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत) होतील, रात्री 9.30 वाजता ‘ही रात्र शाहिरांची’ शाहीर सुरेश सूर्यवंशी पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे, तर रात्री 10 वाजता हरी जागर श्री जगदीश्वर प्रांगणात होईल. किल्ले रायगडावर शनिवार 12 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता श्री जगदीश्वराची पूजा व सकाळी 6 वाजता हनुमान जयंती उत्सव तर सकाळी 8 वाजता श्री शिव समाधी येथे महापूजा तसेच सकाळी 11 वाजता राजदरबारात श्री शिवप्रतिमा प्रतिमा पूजन होईल. या कार्यक्रमास सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान गडारोहन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा श्री शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कार, वितरण शिवराय मुद्रा स्मरणिका प्रकाशन प्रमुख पाहुणे यांचे मनोगत सकाळी 12.45 वाजता, श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक समाधी (राज दरबार ते शिवसमाधी), दुपारी 1.00 वाजता श्री शिवछत्रपतींना मानवंदना (सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस), दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद वितरण (होळीचा माळ) अशा दोन दिवसांचा कार्यक्रम किल्ले रायगड येथे पार पडणार आहे.