रायगडच्या वंशिकाचा लंकेत डंका

इंडो-लंका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये चमकदार खेळी

| वेनगाव | अनिल गवळे |

श्रीलंकेत भरवलेल्या इंडो-लंका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये कर्जतची वंशिका मोहिते हिने पुणे संघातून चमकदार खेळी केली आहे. तिने पाच सामन्यांत पाच बळी घेऊन आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली आहे. ही स्पर्धा कोलंबो, खाटूनायके आणि नुराइलिया या विविध श्रीलंकन शहरांमध्ये पार पडली. बेसिलिका क्रिकेट क्लब, गोल्डन क्रिकेट अकॅडमी आणि आय.पी.एन क्रिकेट अकॅडमी या संघांसोबत हे सामने खेळवण्यात आले. विशेष म्हणजे, नुराइलिया शहरात तब्बल 12 अंश सेल्सिअस तापमानात एच.के.बाउन्सच्या खेळाडूंनी जिद्दीने सामना खेळत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या एच.के.बाउन्स क्रिकेट अकॅडमी पुण्याच्या अंडर-17 चमूने इंडो-लंका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वंशिका मोहिते हिने आपल्या गोलंदाजीत 5 सामन्यांमध्ये 5 बळी घेऊन आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली आहे. भारतीय पुणे एच के बाऊन्स क्रिकेट संघाने एकूण 8 सामन्यांपैकी 6 विजय, 1 सामना बरोबरीत आणि 1 पराभव अशी धुवाधार खेळी करून विजय संपादन केले आहे.

एच के बाउन्स अकॅडमीचे प्रशिक्षक हेमंत किणीकर, अमोल माने आणि रोहिणी तबीब यांचे मार्गदर्शन या यशामागचे खरे शिल्पकार ठरले. तर, श्रीलंकेतील बेसिलिका क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक रोशन सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंशी सामना देत, भारतीय खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध केली. या क्रिकेट खेळाडूंमध्ये वंशिका मोहिते, आर्या मोने, ध्रुव कोंढरे, मयूर सासवडे, हर्षवर्धन जगताप, अजिंक्य पुजारी, आदर्श चव्हाण, अरिहंत उदावंत, स्वरा तबीब, ऋषभ वाधावानी, शार्दूल गराडे, अवनीश गौणकर, श्रीराज घोरपडे यांचा समावेश असून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या क्रिकेट कौशल्याने मने जिंकली आहेत.
वंशिका मोहिते ही पत्रकार संजय मोहिते यांची कन्या असून तिने आपले क्रिकेटचे प्राथमिक प्रशिक्षण कोच राजेंद्र कोंडाळकर यांच्याकडे घेतले. पुढे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अधिक प्रगती साधण्यासाठी ती सध्या पुणे येथे कोच शुभेंद्रू भांडारकर, हेमंत किणीकर, अमोल माने, आणि सुदेश लाटे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. ‌‘उभरता खेळाडू’ म्हणून तिची निवड ही कर्जतकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

Exit mobile version