सभेच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
निवडणूकीत आमदारांसाठी शत्रुत्व पत्करुन दिलीप भोईर यांना चोख प्रत्युत्तर करणारे, दळवींवर येणाऱ्या प्रत्येक आरोपांवर सडतोड उत्तर देणारे, आमदारांचे विश्वासू आणि तथाकथित वारसदार राजा केणी यांना आमदारांनीच फाट्यावर मारल्याचे समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार दळवी यांचा विश्वासू तथा जिल्हा प्रमुख राजा केणी यांचे काहीतरी बिनसले असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून आमदारांनी राजा केणी यांच्याकडे दुर्लक्ष केले तर नव्याने झालेल्या मित्राकडे आमदारांनी विशेष लक्ष दिल्याने दोघांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले होते. आज अखेर दोघांमध्ये नक्कीच आलबेल नसल्याचे सभेच्या निमंत्रण पत्रिकेवरुन सिद्ध झाले आहे. परिणामी, गरज सरो आणि वैद्य मरो, अशी अवस्था केणी यांची झाली असून केणी आमदारांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
मुरुड तालुक्याच्या वतीने आमदारांचा शिवसैनिकांसोबत संवाद, आभार सभा व आढावा बैठक याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी (दि.20) संध्याकाळी 6 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार, त्यांची पत्नी तसेच उपजिल्हा प्रमुुख भरत बेलोसे हे मार्गदर्शन करणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नावाला फाटा देण्यात आला आहे. दरम्यान, आमदारांच्या जवळचे तसेच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे महत्वाचे नेते तथा जिल्हा प्रमुख केणी यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आले असल्याची चर्चा केणींच्या गटाकडून करण्यात येत आहे. शिंदे गटातील आमदार दळवी यांचा खास माणूस म्हणून राजा केणी यांना ओळखले जाते. ठाकरे व शिंदे गट अशी शिवसेनेत विभागणी झाल्यावर शिंदे गटातील जिल्हा प्रमुख म्हणून राजा केणी यांची निवड करण्यात आली. राजकीय पक्षातील वेगवेगळ्या कार्यक्रम पत्रिकेसह जाहीरातीमध्ये राजा केणी यांचे नाव आवूर्जन घेतले जाते. परंतु मुरूड येथे होणाऱ्या शिंदे गटातील संवाद सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये राजा केणी यांचे नावच घेतले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजा केणी यांना पक्षातून काढण्याची हालचाल तर नाही ना, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी दिलीप भोईर विरूध्द राजा केणी यांच्यात वाद झाले होते. हा वाद विकोपाला पोहचला होता. एकमेकांविरोधात ते आरोप प्रत्यारोप करीत होते. मात्र अलिकडेच भोईर यांनी आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धेत आमदारांनी उपस्थित राहून दिलीप भोईर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी राजा केणी यांनी एका सोशल मिडीयावर एक वादग्रस्त मेसेज व्हायरल केला होता. त्यामुळे राजा केणी यांच्याबाबत आमदार नाराज तर नाहीत, ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
शिंदे गटात अंतर्गत वाद
सध्याचे राजकारण पाहता, व आमदारांची भोईरांसोबतची जवळीक पाहता, राजा केणी यांना पक्षात स्थान नसल्याचे आमदारांच्या कृतीतून दिसून येत आहे. पदावर असतानाही तसेच जिल्हा प्रमुखाचे नाव वगळून उपजिल्हा प्रमुखाचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातील शिंदे गटात अंतर्गत वाद सुरु असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.