| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “विकसित भारत बिल्डाथॉन 2025” अंतर्गत विज्ञान विषयक अभिनव कल्पनेचे सादरीकरण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांच्या डॉ. जयंत नारळीकर गटाची रायगड जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी निवड झाली असून, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या गटामध्ये पार्थ सुतार, सृष्टी पवार, आस्था कोंडे, सिद्धी ऐत आणि निधी फराडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगासाठी कमी खर्चातील “सोलार पॉवर अम्ब्रेला” हा अभिनव प्रकल्प सादर केला. विद्यार्थ्यांनी साध्या छत्रीचे रूपांतर सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्मार्ट छत्रीत केले आहे. सुरुवातीला मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, लोकांचे अभिप्राय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात आणखी सुधारणा करत छोटा पंखा आणि रात्री अंधाऱ्या रस्त्यावर चालताना प्रकाश मिळावा यासाठी बल्बची सुविधाही उपलब्ध करून दिली. कमी खर्चात उपयुक्त आणि पर्यावरणपूरक सुविधा देणारा हा प्रकल्प परीक्षकांच्या पसंतीस उतरला आणि त्याची राज्यस्तरासाठी निवड झाली.







