दुधाची भुकटी जाळल्याप्रकरणी कारवाईस टाळाटाळ

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दुधाची भुकटी जाळल्याचा धक्कादायक प्रकार दि.11 जून रोजी उघडकीस आला आहे. अंगणवाडीच्या मुलांना वाटण्यात येणारी दुधाची भुकटी जाळूनदेखील अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कारवाई करण्यास प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.

अंगणवाडीतील मुलांच्या तोंडचा घास हिसकावून घेऊन दुधाची भुकटी जाळण्यात आली. या घटनेची कोणतीही चौकशी झालेली नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतरदेखील प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. याबाबत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भुकटी जाळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Exit mobile version