मच्छीची भुकटी बनवणार्या कारखान्यांमुळे दुर्गंधी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांत मच्छीपासून भुकटी तयार करण्याची प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान सडलेल्या मच्छीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, औद्योगिक क्षेत्र परिसरातील वसाहतीमधील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहत आणि प्रदूषण हे वर्षानुवर्षीचं समीकरण सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पुढारी काम करत आहेत. येणार्या तक्रारिंची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनदेखील प्रदूषणास जबाबदार कारखान्यांविरोधात वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. मात्र, असे असतानाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रदूषणास जबाबदार उद्योगांना कारखाने सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने एमपीसीबीचा नाईलाज होत आहे.
खतनिर्मितीसह माशांचे खाद्य म्हणून वापर
सद्यःस्थितीत तळोजा औद्योगिक वसाहतीत मच्छीपासून भुकटी तयार करणारे तीन कारखाने सुरु आहेत. या ठिकाणी अत्यंत गलिच्छ वातावरणात सुकलेल्या मच्छीची भुकटी तयार करण्यात येते. या भुकटीचा वापर खत तसेच जिवंत माशांचे खाद्य म्हणून केले जात असल्याची माहिती काही जाणकारांनी दिली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान आजूबाजूला दुर्गंधी पसरू नये म्हणून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने पसरणार्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
एमआयडीसीला तपासणीचा विसर?
औद्योगिक वसाहतीत कोणत्या प्रकारचे कारखाने याची परवानगी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देते. ही परवानगी देताना संबंधित कारखाना प्रदूषणात भर घालतंय का, हेदेखील एमआयडीसीने तपासणे गरजेचे आहे. जेणे करून प्रदूषणाच्या तक्रारीत कमी येईल, असे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.
भुकटी तयार करणार्या कारखान्यांना ताकीद
दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना होणार्या त्रासाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटिसीद्वारे रात्रीच्या उत्पादन प्रक्रिया बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे अधिकारी वैभव भालेराव यांनी दिली आहे.