। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी (दि. 01) लोकसभेत आर्थिक वर्ष 2024-2025 चा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
कृषी, लघू मध्य उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार इंजिन्स असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. यावेळी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे 100 जिल्ह्यांना फायदा होणार असून कमी उत्पादन क्षमता असलेल्या राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच, डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकार सहा वर्षांचा विशेष कार्यक्रम राबवणार. केंद्र सरकारच्या एजन्सी पुढील तीन वर्षात तूर, उडीद, मसूर या डाळी खरेदी करणार. तर, भाज्या आणि फळ खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे भाज्या आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्यांच्या साहाय्याने केंद्र सरकार विशेष योजना राबवेल, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, यावेळी त्यांनी किसान क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यात येणार असल्याचे घोषित केले. यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे, ज्यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता सहजपणे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.