सुविधांचा अभाव; दुरूस्तीसाठी निधीची वानवा
। महाड । प्रतिनिधी ।
जल संपदा विभागाच्या जलविज्ञान प्रकल्पांतर्गत महाड तालुक्यामध्ये हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली, परंतु आता सदरची हवामान केंद्र, सरित केंद्र निधी अभावी धुळखात पडून आहेत, याचा परिणाम पूर आणि हवामान अतिवृष्टीच्या संभाव्य सुचना मिळत नाहीत. जर वरील केंद्र सुस्थितीत असती तर संभाव्य अतिवृष्टी त्याच बरोबर पूर संबंधीच्या पूर्व सुचना मिळाल्या असत्या आणि सर्व सामान्यांचे नुकसान टळले असते असे मत महाड मधील सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या जन संवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून धरणाचे प्रकल्प आणि यावरील योजना, कालव्याचे प्रकल्प राबविले जातात. त्याचप्रमाणे अनेक धरण प्रकल्पाच्या परिसरातील हवामान केंद्र देखिल सुरु करण्यात आली आहेत. परंतु दुर्दैवाने या हवामान केंद्राची सध्याची परिस्थिती अत्यंत दयनिय झाली असून अनेक वर्षापासून धुळ खात पडली आहेत. वास्तविक या हवामान केंद्रातून हवेची दिशा, पावसाचे संकेत त्याच बरोबर या ठिकाणी बसविण्यात आलेले सरिता मापण केंद्राच्या माध्यमांतून पाण्याची पातळी इत्यादी माहिती उपलब्ध होत होती. सुमारे दहा वर्षापूर्वी महाड तालुक्यात ज्या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते, त्याच बरोबर वादळ वार्याचे प्रमाण असते अशा परिसरांमध्ये हवामान केंद्र उभारण्यात आली होती.
महाड तालुक्यात आंबवली, भावे, बिरवाडी, कोकरे, कोतुर्डे, कोथेरी, वरंडोली, वाकी या गावांमध्ये जलसंपदा विभागाच्या जल विज्ञान प्रकल्पांतर्गत हवामान केंद्र आणि सरिता मापन केंद्र सुरु केले होते. बिरवाडी गावा जवळच्या पिंपळदरी येथे सन 1993 मध्ये हवामान केद्र सुरु करण्यात आले, या ठिकाणी सन 2000 मध्ये प्रयोग शाळा देखिल सुरु करण्यात आली. तसेच तालुक्यातील गांधारी काळ या प्रमुख नद्यांवर सरिता केंद्र सुरु करण्यात आल्या होत्या. नदींवर झुलता पाळणा देखिल टाकण्यात आला आहे. या पाळण्याच्या एका बाजुला मापन पट्टी बसविण्यात आली असून यासाठी जलसंपदा विभागाकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले. दुर्दैवाने सरिता केंद्राकरीता बसविण्यात आलेल्या पाळण्याची दुरवस्था झाली असून पाळणे पुर्णपणे गंजून देखिल गेले आहेत.
शासनाची फसवणूक
सरिता केंद्रावर दर वर्षी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सन 2010-11,2016-17,2018-19, 2020-21 या सालांमध्ये एक लाखा पेक्षा अधिक खर्च करण्यात आल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षापासुन बहूतांशी सरिता केंद्र गंजून गेल्याने बंद पडलेली असताना लाखो रुपये खर्च करुन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
महाड शहरात दरवर्षी येणारा पूर ही समस्या सोडविण्यात शासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
निलेश पवार, जन संवाद संस्थेचे अध्यक्ष