| पाली/बेणसे | वार्ताहर |
मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे सोमवारी (दि.18) रात्री माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासीवाडी पाण्याने वेढली गेली. स्थानिक प्रशासन, पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 नागरिकांची सुखरूप सुटका केली. मंगळवारी (दि. 19) पहाटे तीन वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.अडकलेल्या नागरिकांमध्ये छोटी मुले, वृद्ध नागरिक, रुग्ण व महिला यांचा देखील समावेश होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अतिवृष्टीमुळे खांदाड आदिवासी वाडीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. महसूल प्रशासन, पोलीस विभाग तसेच स्थानिक नागरिकांनी वाडीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर पडण्याचे आवाहन केले. यामध्ये काही लोक बाहेर पडले, मात्र सुमारे 25 ते 30 नागरिक वाडीतच अडकले. रात्री पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागल्यामुळे पोलीस प्रशासनाने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या एसव्हीआरएसएस टीमला घटनास्थळी पाचारण केले. रात्री साडेअकराच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्या मदतीने संयुक्तरीत्या बचावकार्य राबविण्यात आले. अडकलेल्या सर्व नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या नागरिकांची व्यवस्था खांदाड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आली असून, तेथे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.







