निवृत्त जवान बंधूंचा हमरापूर येथे सत्कार

। हमरापूर । वार्ताहर ।
पेण, हमरापूर येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असणारे दोन सख्खे भाऊ स्वप्नील मनोहर पाटील आणि मयुर मनोहर पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने हमरापूर गावासह अनेक मान्यवरांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या सुह्द्य सत्काराने दोन्ही बंधू कमालीचे भारावून गेले होते.

माजी सरपंच मनोहर पाटील यांची स्वप्निल, मयुर व सुजित ही तीन मुले आहेत. 2005 साली स्वप्निल हा भारतीय लष्करात भरती झाला. मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन मयूर हा देखील 2007 साली लष्करात भरती झाला. हे दोघेही सख्खे जवान भाऊ सेवानिवृत्तीनंतर आपल्या राहत्या हमरापूर या गावी परतले. त्यावेळी सर्वांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. गावात त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

गावातील शिवमंदिरात शिवप्रेमी संघाच्यावतीने उभयतांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेली कार्यक्रमास जि.प.च्या माजी सभापती अ‍ॅड. निलिमा पाटील,माजी जि.प. सदस्य डी.बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, माजी उपसभापती के.मा.पाटील, काळोजीशेठ मोकल, स्मिता प्रमोद पाटील, हमरापूरचे सरपंच प्रदीप म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस संजय डंगर, परशुराम पाटील, काशिनाथ पाटील, अक्षर विद्यालयाचे मुख्याध्यापक डोंगरदिवे सर, न्यू इंग्लिश स्कूल जोहे शाळेचे प्राचार्य साईनाथ पाटील,दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भुवड, कॉ. संदेश पाटील, दुर्गादेवी क्रिकेट क्लबचे सदस्य, दुर्गादेवी नवराञोत्सव मंडळाचे सदस्य, बहिरीदेव नवराञोत्सव मंडळाचे सदस्य तसेच दोन्ही जवानांचे वर्ग मिञ, हमरापूर गावासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी निलिमा पाटील, डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हाञे आदींनी स्वप्निल व मयुर पाटील यांनी आतापर्यंत देशाची केलेल्या देशसेवेबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच आपली दोन्ही मुलं लष्करात भरती केल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे देखिल कौतुक केले. स्वप्निल पाटील याने लान्स हवालदार म्हणून तोफखान्यात गुरेज सेक्टर, जम्मू आणि काश्मीर, सिमला, सिकंदराबाद, झांसी येथे आपली सेवा बजावली आहे. या 17 वर्षात अनेक घडामोडी घडल्या. काही ठिकाणी अतिरेक्यांशी चकमकी देखिल झाल्याचे सांगितले. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आम्ही आमची सेवा बजावून मायभूमीत परतल्याचे सांगितले. मयुर पाटील याने सिग्नलकोर म्हणून मेरठ, आसाम, जम्मू आणि काश्मीर, मुंबई, मथुरा, मेरठ, जबलपूर याठिकाणी सेवा बजावली असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. दोन्ही जवानांच्या आई बेबीताई पाटील व त्यांच्या पत्नी यांनी गेल्या सतरा वर्षांतील आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमा ठिकाणी थोडेसे भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सूत्रसंचालन संजय डंगर यांनी केले.

Exit mobile version