। राबगाव । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसह पाली – खोपोली राज्यमार्गाची पहिल्याच पावसात भयानक अशी अवस्था झालेली पहायला मिळत आहे. यामध्ये पाली खोपोली वाकण राज्य महामार्ग असेल,सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते असतील,जिल्हा परिषदेचे रस्ते असतील किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते असतील, या रस्त्यांनी पहिल्याच पावसात दम सोडला असून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली बघायला मिळत आहे.
पाली- खोपोली राज्य महामार्गावर मिरकूटवाडीच्या पुलाजवळ रस्त्याला भला मोठा खड्डा पडला आहे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. याठिकाणी वाहनचालकांना रस्त्याचा शोध घेत खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान होत असून महागड्या गाड्या नादुरुस्त होत आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्याठिकाणी जीएसबी मटेरियल टाकून ते सुस्थितीत करण्यात आले आहे. बेजबाबदार प्रशासन व मुजोर ठेकेदार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. एकंदरीत संबंधित प्रशासन ठेकेदाराला जावई बनवितात की काय असे देखील वाटू लागल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
अशीच काहीशी परिस्थिती रासल गावाजवळ झाली आहे.रासल गावाजवळ महामार्गाचे काम अपुरे असल्यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे तसेच वाहतूक चालू असलेली बाजू पूर्णतः पाण्याखाली आहे त्यामुळे वाहनचालकांना त्यामधून मार्ग काढताना अडचणी निर्माण होत आहेत. त्याठिकाणी अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये झालेली रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे सगळीकडे पाहायला मिळत आहे.ग्रामपंचायत अंतर्गत झालेले रस्ते यांची देखील दुरवस्था झाली आहे.नुकताच झालेला खुरावले फाटा ते वाघोशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा वाजला आहे.रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.खुरावले फाटा ते वाघोशी दरम्यान रस्त्याला जागोजागी खड्डे पडेल असून खड्ड्यांमधील खडी, माती अन्य मटेरियल बाहेर रस्त्यावर अस्थाव्यस्थ झाले आहे.
पाली,जांभूळपाडा या पुलांचे काम अर्धवट असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला चिखल व दगडं पसरली आहेत.त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत आहेत. शिवाय पाली आंबा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे वाहतूक जुन्या पुलावरून चालु आहे.जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याकडे ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाही.त्यामुळे जुन्या व जर्जर झालेल्या पुलावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.
– राहुल सोनावळे, अध्यक्ष आरपीआय सुधागड तालूका.