| पनवेल | वार्ताहर |
मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवुन त्याला बेदम मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीतील 5 लुटारुंना पकडण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील इतर 3 आरोपी अद्याप फरार असुन पोलिसांकडुन त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना पोलिसांनी सदर गुह्याचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे तपास करुन महामार्गावर लुटमारी करणाऱ्या टोळीला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी या आरोपींकडुन 5 मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार ट्रक चालक गेंदलाल पटेल हा सोमवारी (दि. 9) सफ्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरुन जात असताना, तो पळस्पे पोलीस चौकीपासून काही अंतरावर लघुशंकेसाठी थांबला होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या 7 ते 8 लुटारुंनी या ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला बेदम मारहाण केली होती. तसेच त्याच्याजवळ असलेले 2 मोबाईल फोन तसेच 23 हजाराची रोख रक्कम लुटून पलायन केले होते. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर परिमंडळ-2चे पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिसांचे स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ट्रक चालकाकडुन सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन तांत्रिक पद्धतीने तपास सुरु केला. यावेळी ट्रक चालकाकडुन लुटण्यात आलेल्या एका मोबाईल फोनचे लोकेशन खालापुर मधील निंबोडेवाडी येथे असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोलीस हवालदार विजय देवरे, सुनील कुदळे, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत आदींच्या पथकाने वेशांतर करुन दोन दिवस निबोंडेवाडी गावामध्ये आरोपींचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून रोहन उर्फ गुड्डु नाईक (24), रोहिदास पवार (23), आतेश वाघमारे (26), मनिष वाघमारे (35) व शंकर वाघमारे (18) या पाच जणांना अटक केली. या गुह्यातील अटक आरोपींना न्यायालयाने 20 सफ्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या गुह्यात सहभागी असलेले इतर 3 आरोपी फरार असून पोलिसांकडुन त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या गुह्यात 8 आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात आढळुन आल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यातील अटक आरोपी रोहन उर्फ गुड्डु नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापुर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 व खालापुर येथे 1 असे जबरी चोरीचे व दरोड्याचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.