| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवर वाढत्या खर्चाचा ताण पडत असून, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी अनेक वर्षांनंतर पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासनाने सुचविलेल्या दरापेक्षा कमी दर निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या आकडेवारीनुसार सन 2025-26 मध्ये पाणीपट्टीतून सुमारे 1 कोटी 36 लाख 49 हजार 676 रुपये उत्पन्न मिळाले असून, पाणीपुरवठा विभागाचा अपेक्षित खर्च 3 कोटी 2 लाख 75 हजार रुपये इतका आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. एल निनोच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण घटल्याने भविष्यात पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे वीजबिलात झालेली वाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ, कच्च्या पाण्याच्या देयकांमध्ये झालेली वाढ, महागाई आणि पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च यामुळे पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेडगे यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार पाणीपट्टीमध्ये वार्षिक 3,600 रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून नगरपरिषदेने ही वाढ कमी करत 2,800 रुपये इतकी ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी अजय एडके, पर्यटन व नियोजन सभापती महेश कोलाटकर, शिक्षण सभापती रविंद्र चाळके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, पूर्वा मोहिते, नीता हजारे, फराह पानसरे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
रोहा नगरपरिषदेकडून पाणीपट्टीमध्ये वाढ
