रोहाः शस्त्रसाठा प्रकरणी आणखी एकास अटक

| अलिबाग | प्रतिनिधी |

रोहा येथील तन्मय भोगटे या तरुणाकडे कोट्यवधी रुपयांचा शस्त्रसाठा व हरिणाच्या शिंगांसह अन्य प्राण्यांची शिंगे सापडल्याने रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी आणखी एकाला अटक केली असून, त्याच्याकडे ठासणीची बंदूक आढळून आली आहे.

रोहा शहरातील धनगर आळी येथील तरुणाकडे हरिण व अन्य प्राण्यांच्या शिंगाची 22 जोडी, तलवार, कोयते, बंदुका, पिस्तूल, काडतुसे असा कोट्यवधी रुपयांचा शस्त्रसाठा व प्राण्यांचे अवयव आढळून आले. फक्त 12 वीचे शिक्षण घेतलेल्या सामान्य कुटुंबातील 24 वर्षीय तन्मयकडे हा साठा सापडल्याने पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये आणखी आरोपींचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय होता. हा शस्त्रसाठा त्याने कोणा-कोणाला पुरवठा केलाय, याबाबत शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. याप्रकरणी तन्मयला न्यायालयात हजर केले असता त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी तन्मयला पोलिसी खाक्या दाखवताच तयाने त्याच्याकडील एक बंदूक तळा तालुक्यातील लक्ष्मण हिलम या 40 वर्षाच्या इसमाला दिल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मणला अटक केली. लक्ष्मण हा तारणे आदिवासीवाडीमध्ये राहात असून, त्याने तन्मयकडून सुमारे पाच ते सहा हजार रुपयांना बंदुक विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे करीत आहेत.

Exit mobile version