| माणगाव | प्रतिनिधी |
सामाजिक कार्यात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील पत्रकार सलीम मुबारक शेख यांची संघाच्या अध्यक्षपदी सलग आठव्यांदा एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
माणगाव तालुका पत्रकार संघाची सभा नववर्षाच्या शुभमुहूर्तावर शनिवार, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत सन 2025 या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. त्यामध्ये पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील सलीम शेख यांची सलग आठव्यांदा एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. संघाच्या कार्याध्यक्षपदी प्रभाकर मसुरे, उपाध्यक्षपदी मजिद हाजिते, निलेश म्हात्रे, प्रवक्तेपदी संतोष गायकवाड, सचिव सचिन देसाई, खजिनदार स्वप्ना साळुंके, मार्गदर्शक उद्योजक खेमचंद मेथा, सल्लागार आजेश नाडकर, तरुण मराठी उद्योजक सुभाष दळवी, कायदेशीर सल्लागार ॲड. केदार गांधी, कार्यकारिणी सदस्य सुप्रिया शिंदे अशी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना अध्यक्ष सलीम शेख यांनी सुरुवातीला आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व ऋण व्यक्त केले. ते म्हणाले, गेली आठ वर्षे माणगाव तालुका पत्रकार संघ औषध व फळवाटप, महारक्तदान शिबीर व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान असे विविध कार्यक्रम सातत्याने राबवित असून, यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्यक्रम आपण राबविणार आहोत. सोमवार दि.6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पत्रकार दिनानिमित्त आपण संघातर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषध व फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.