बचत गटांचा वापर आर्थिक उन्नतीसाठी करावा

सरपंच वंदना थोरवे यांचे मत
। नेरळ । प्रतिनिधी ।
महिलांनी प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर बचत गट स्थापन केले आहेत, मात्र ते बचत गट पंचायत समितीकडून ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी आणि त्यांच्या माध्यमातून व्यवसाय करून उत्पन्नाचे आर्थिक सोर्स निर्माण करावेत अशी सूचना उकरूळ ग्रामपंचायतच्या सरपंच वंदना थोरवे यांनी केली. उकरूळ ग्रामपंचायत मधील महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या ग्रामसंघाच्या बैठकीत बोलताना महिला बचत गटांनी व्यवसाय उपयोगी उपक्रम सुरू केल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
उकरूळ या एका गावाच्या ग्रामपंचायत मध्ये महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या 10 गट यांचे मिळून एक ग्रामसंघ बनविण्यात आला आहे.उकरूळ ग्रामपंचायत हद्दीमधील पहिल्या महिला ग्रामसंघ यांच्या बैठकीचे आयोजन सरस्वती ग्रामसंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी उकरूळ ग्राम पंचायतच्या सरपंच वंदना थोरवे, कर्जत पंचायत समिती बचत गट विभागाच्या प्रमुख रेश्मा लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रंजना धुळे यांची उपस्थिती होती. उकरूळ ग्रामपंचायत मध्ये पहिले ग्रामसंघ स्थापन झाले असून त्या ग्रामसंघमधील सभासद 120 महिला सदस्यांना बचत गट चळवळीची माहिती देण्यासाठी कर्जत पंचायत समिती येथून अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले. सरस्वती ग्रामसंघाच्या अध्यक्ष प्रियांका प्रशांत खडे,सचिव जयश्री चंद्रकांत खडे, खजिनदार कोमल गणेश खडे, लिपिक चारुशीला मंगेश थोरवे, दर्शना नरेंद सोमणे, सीआरपी भारती सोमणे तसेच सरस्वती ग्राम संघाचे सर्व सभासद महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version