| पनवेल | वार्ताहर |
पनवेल ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून पनवेल महापालिकेकडे तसेच संबंधित शासकीय वैद्यकीय विभागाकडे करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात परप्रांतीय बोगस डॉक्टरांनी आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. अनेक डॉक्टरांच्या डिग्र्यासुद्धा बोगस असल्याचे दिसून येत आहे. अशांविरुद्ध यापूर्वीसुद्धा कारवाई करण्यात आल्या आहेत. पनवेल परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याने या डॉक्टरांनी अशा ठिकाणी आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. जुजबी वैद्यकीय औषधांचे ज्ञान, इतर ठिकाणी डॉक्टरांच्या हाताखाली केलेली कामे, तसेच इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन त्या आधारे उपचार करण्याचे प्रकार हे बोगस डॉक्टर करीत आहेत. त्यामुळे अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नाहक जीवावरसुद्धा बेतू शकते. या घटना टाळण्यासाठी तातडीने अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे असल्याने संबंधित शासकीय वैद्यकीय विभागाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.