। उरण । प्रतिनिधी ।
उरण मतदार संघात समाजाच्या सेवेचे यथाशक्ती काम करताना समाजसेवेचा हा रथ असाच पुढे चालविण्यासाठी मी माझा मुलगा प्रीतम म्हात्रे तुमच्या हवाली करत आहे, त्याला तुम्ही विधानसभेत पाठवा, असे भावनिक आवाहन जे. एम. म्हात्रे यांनी मोहोपाडा येथे भव्य जाहीर सभेत केले आहे.
उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना जे.एम. म्हात्रे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात उरण विधानसभा मतदार संघात रस्ते, पाणी व इतर अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. विद्यमान आमदारांनी या विभागात साधी भेटही दिलेली नाही. त्यामुळे या समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. मात्र, या भागातील अनेक मंदिराना शेकापने यथाशक्ती मदत केली आहे. कोरोना काळात शक्य होईल तेवढी मदत नागरिकांना पोहचवण्याचे काम शेकापच्या माध्यमांतून केले आहे. इर्शालवाडी दुर्घटनेच्या वेळीही मदतीसाठी पोहचला. त्यामुळे येथील जनतेशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भविष्यात आपल्याला हा सांस्कृतिक संवाद असाच पुढे चालू ठेवायचा आहे. त्या दृष्टीने माझा मुलगा प्रीतम म्हात्रे याला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले असून त्याला निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. तुम्हीच आता त्याला विधानसभेत पाठवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.