। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना परप्रांतीयाकडून मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी (दि.29) कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणात अखिलेश शुक्ला यांच्यासह त्यांची पत्नी गीता शुक्ला, सुमित जाधव, दर्शन बोराडे यांच्यासह सात जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. त्यानंतर पु्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रविवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मारेकर्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे हे सर्व मारेकरी आधारवाडी कारागृहात नेण्यात आले.
शुक्ला हे राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळात व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. अलीकडेच विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्ला यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. तसेच, शुक्ला यांच्या खासगी वाहनावरील अंबर दिवा आरटीओने जप्त केला आहे. या दिव्याचा नियमबाह्य वापर केला म्हणून त्यांना 9 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.