पालिकेच्या कारभारावर ग्रामस्थांकडून संताप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात नवीन नळपाणी योजनेचे काम सुरु झाले आहे. मात्र, आता उन्हाळा जाणवू लागला असल्याने सर्वांना पाण्याची गरज भासू लागली आहे. मात्र, कर्जत नगरपरिषद हद्दीमधील दहिवली शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्या भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले असून, आता उन्हाळा सुरु झाल्यावर तेथील बोअरवेलचे पाणीदेखील तळाशी गेले असल्याने स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कर्जत शहरातील नागरिक भाजप प्रदेश कार्यकर्त्या कल्पना दास्ताने यांनी पालिकेच्या कारभाराबद्दल खडेबोल सुनावले आहेत.
कर्जत शहरात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आमच्या सुयोग नगर, साईनगर, समर्थ नगर, विभागातील सगळ्यांच्या बोअरवेलचे पाणी गेलेले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या पाण्याची वाट या भागातील सर्व नागरिक पाहात असतात. त्यात नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणार्या महिलांची मोठी तारांबळ उडालेली दिसून येत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी नगरपरिषद कार्यलयात संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाही अशी स्थितीत भाजप नेत्या कल्पना दास्ताने यांनी आपला संताप व्यक्त करताना पालिकेला लिहिलेल्या पत्रात नमूद केली आहे.
पाणीपुरवठा होणारे अपडेट मिळत नसल्याने महिला वर्ग संतप्त आहे. अधिकारी वर्ग फोन उचलत नसल्याने कल्पना दास्ताने यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजून पूर्ण चार महिने ही भयंकर पाणीटंचाईची परिस्थिती सुरूच राहणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना सूचना द्याव्यात जेणेकरून आम्हाला सोयीचे होईल. यामध्ये जर काही सुधारणा झाली नाही तर आम्हाला आमच्या मार्गाने तुमची भेट घ्यायला लागेल, असा इशारा दास्ताने यांनी कर्जत नगरपरिषदेला दिला आहे.