ओल्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची पायपीट; स्थानिकांचे आरोग्य धोक्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उरण-पनवेल-नेरळ भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या वाकस गावाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरून दिवसरात्र सांडपाणी वाहत असते. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच सांडपाण्याचे ओल्या राहणाऱ्या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी देखील पायपीट करीत असतात. मात्र, तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाला त्याचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
वाकस गावामधून जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. नेरळ- कशेळे हा मार्ग भीमाशंकरकडे जाणारा रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. नेरळ कडून कशेळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकस येतील आदिवासी वाडीमधून येणारे सांडपाणी वाहत वाहत रस्त्याने जात असते. त्या वाहत्या पाण्यामुळे अनेक वाहने ये-जा करताना रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या वाटसरु यांच्या अंगावर पाणी उडत असते. वाहन आल्यानंतर रस्त्याने चालणारे वाटसरु यांना त्या घाण पाण्यापासून स्वतःच बचाव करण्याची काळजी घ्यावी लागते. समोरून वाहन आले तर रस्त्याने चालणारे प्रवासी किंवा वाहन चालक यांच्या अंगावरती ते सांडपाणी उडत असते. त्यात त्या सांडपाण्याला दुर्गंधी असल्यामुळे याचा त्रास प्रवाशांना होत आहे. तसेच रस्त्यालगत गुरांचे शेण आणि घरातील कचरा टाकत असल्याने ही घाण रस्त्यावरती आल्याने रस्त्यावरती घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येवर कोणीही आवाज उठवायला तयार नाही असे पाहायला मिळत आहे. कारण हे पाणी अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाहत असते. या सांडपाण्याचा स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांन त्रास तर होत आहेच, लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता देखील लवकर खराब होण्यास कारणीभूत ठरत आहे. वाकस येतील आदिवासी वाडी मधून येणारे सांडपाणी हे रस्त्यावरती न येण्यासाठी वाकस ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीमध्ये असलेले प्रशासक यांना या समस्येबाबत आपली कैफियत सांगितले. त्यावेळी प्रशासक यांच्याकडून ग्रामसभेमध्ये या सांडपाण्याबाबत नियोजन करण्यात आले नाही. या सांडपाण्याकडे वाकस ग्रामपंचायतीमधील प्रशासक यांच्याकडून वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले जात आहे. रस्त्यावर येणारा सांडपाणी आणि वर्षानुवर्षे सांड पाण्यातून होणारा प्रवास कधी संपणार असा ही प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
प्रवाशांची नाराजी
नेरळ कशेळे मार्गावर वाकस येथे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तेथील आदिवासीवाडी मधून येणारे सांडपाणी हे रस्त्याच्या बाजूने गटार काढून ते सांडपाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी स्थानिक ग्रामपंचायतीकडून घेण्याची गरज आहे.






