लैंगिक अत्याचार करणार्‍यास अटक

| पनवेल । वार्ताहर।

आपले पहिले लग्न झाले असताना हे सत्य लपवून दुसर्‍या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी 34 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. शशांक रत्नाकर म्हात्रे (34) असे त्याचे नाव आहे.

शशांक याने काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण केले. दरम्यान, त्याचे लग्न झाले असल्याची बाब त्याने या तरुणीपासून लपवत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला स्वतःच्या घरात व अलिबाग, अक्कलकोट अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर एके दिवशी तिने शशांकचा मोबाईल फोन तपासला असता त्याचे लग्न झाल्याची सत्यता तिला समजली. त्यामुळे पीडित तरुणीने त्याला याचा जाब विचारला असता, त्याने तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणात शशांकने आपली फसवणूक केल्याने पीडित तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शशांक म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version