| जळगाव | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे निष्ठावंत नेते तथा राज्याचे तब्बल पंधरा वर्षे खजिनदार राहिलेले जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर ईडी आणि आयकर विभागाने गुरुवारी छापेमारी केली. एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे खजिनदार असल्या कारणाने पक्षाला झालेली विविध ठिकाणाहून फंडिंग तसेच कागदपत्र यासह विविध कारणांसाठी ही चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.
पहाटे चार वाजेपर्यंत या सर्वच ठिकाणी चौकशी सुरू होती. मुंबई,नागपूर,औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या दहा गाड्या गुरुवारी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली. सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. यात माजी आ.मनीष जैन यांचीही अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेतली.
साठ जणांच्या ईडीच्या पथकाकडून चौकशी केली जात होती. चौकशी सुरू असताना ग्राहकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तसेच आतमधील कर्मचाऱ्यांनाही बाहेर उभे करण्यात आले होते. दोन्ही पथक कोणत्या कारणासाठी चौकशी करीत आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. स्टेट बँककडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातसुद्धा सीबीआयने राजकल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती. यादरम्यान ईश्वर बाबूजी जैन यांच्याकडून ताकीद कर्जापैकी एकूण 40 कोटींची रक्कम भरण्यात आली होती व कारवाईला तात्पुरती स्थगिती घेण्यात आली होती. आज होत असलेल्या या चौकशी बाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.