पारंपारिक खेळातून चाहूल; महिलांकडून ग्रामदेवतेसाठी प्रार्थना
। दिघी । वार्ताहर ।
जिल्ह्यात विविध ठिकाणी होळी साजरी करण्यात येते. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनमध्ये होळीचा सण पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. तालुक्यात शिमगोत्सवाची चाहूल होळीच्या पंधरा ते वीस दिवस आधीच लागते. यावेळी गावोगावी महिलांकडून गायनातून ग्रामदेवतेसाठी प्रार्थना केली जाते. तसेच, महिलांकडून चौकाचौकातून ‘अवळी दवळी’ तर दुसरीकडे तरुण मंडळी ‘लाभ लाभ’ खेळ खेळताना दिसत आहेत. आज ही या पारंपरिक खेळानेच शिमगोत्सवाची सुरुवात होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फाल्गुनात पंचक्रोशीतील गावांत गायनातून आनंदाचा नाद घुमू लागताच शिमगोत्सवाची चाहूल लागते. दरम्यान, या उत्सवाची उत्सुकता माहेरी येण्यार्या महिलांमध्ये अधिकच असते. कारण त्यांच्या माहेरी येण्याने ‘अवळी दवळी’ या खेळातून शिमगोत्सवाला सुरूवात होत असते. तसेच, खास गणवेश परिधान केलेले गावागावांतील खेळे होळीआधी साधारण चार-पाच दिवस आधी घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे हे खेळे अनवाणी असतात. शेजारील गावांतील प्रत्येक घरात डफ, टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचल्यानंतर होळीच्या पूर्वसंध्येला हे खेळे माघारी परततात. घराच्या अंगणात नाचणार्या खेळ्यांच्या चमूला ओवाळणी घालण्याची प्रथा आहे.
पंचमीला पहिल्या होळीचा प्रारंभ होतो. तर, होळीच्या पूर्वसंध्येला वाजतगाजत ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर होळी तयार केली जाते. होळीला पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आणि खास पद्धतीने गार्हाणे घातले जाते. गावकरी होळीला नारळ अर्पण करतात आणि नवस फेडतात. होळीनंतर दुसर्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येते. ग्रामदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते. पुढे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाने जागरण करण्यात येते. तर, शेवटच्या दिवशी पालखी सोहळ्याला गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात वैशिष्ठ्यपुर्ण शिमगोत्सवाची सांगता करण्यात येते.